'कथा उजेडाच्या' आणि 'तसं झालं असतं तर।' या वाचकप्रिय कथासंग्रहानंतरचा 'आभाळाचं पान' हा प्रा. श्रीकांत मुळे यांचा तिसरा कथासंग्रह. यातील तिन्ही दीर्घ कथांमधील नायिका एकूणच सर्व स्त्री पात्रे सुंदर, बुध्दिमान आणि विलक्षण साहसी आहेत. वास्तव जीवनातील जटिल समस्यांशी त्या निर्भयपणे संघर्ष करतात. 'कथा गोठवलेल्या आयुष्याची', या कथेची नायिका, मधुरा ऊर्फ कँडी जगरहाटीला, भावनेला खंबीरपणे बाजुला सारते. नव्या वैज्ञानिक सुविधांची धैर्याने कास धरते. एका विशिष्ठ परिस्थितीत जगावेगळं पाऊल उचलते. बदलत्या, नव्या युगाची ती अग्रदूत ठरावी. कुटुंबसंस्थेला अजूनही अनन्यसाधारण महत्व आहे. जीवाला जीव देणारं, स्वधर्माची चाड असणारं, प्रेमळ सशक्त कुटुंब, आपल्या पिलांच्या पाठीशी असेल, तर खडकावरही मोगरा फुलतो, याचा सुखद अनुभव मनोरमा आणि शिवा या सासू-सुनेला, 'आभाळाचं पान' मध्ये येतो. अन्यथा, सभ्यतेचा बुरखा पांघरलेले लांडगे सर्वत्र सदैव टपूनच असतात. 'झेला' या कथेत झेला चं जीवन वेगळंच वळण घेतं. या कथासंग्रहातील कथांमध्ये सहनशीलता, स्वधर्म, अलौकिकता, विज्ञान आणि मानवी क्रौर्य यांचा साधलेला मिलाफ वाचकांना नक्कीच दंग करून सोडेल.