आनंदमय जीवनाचा सहजमार्ग
रा. रा. जांभेकर
जन्म २१-२-१९३३ रोजी कोकणपट्टीतील राजापूरजवळ एका लहानशा खेडेगावी झाला. घरच्या सामान्य आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण कसेबसे माध्यमिक शालांत परीक्षेपर्यंत पूर्ण करता आले. त्यानंतर थोडी वर्षे कोकणातीलच एका आड खेडेगावांत प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी केली. पुढे तत्कालीन पोस्ट व तार खात्याची स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण करून त्या खात्यांत टेलिफोन ऑपरेटर म्हणून नोकरी केली. त्या निमित्ताने भुसावळ, पनवेल, पुणे येथे वास्तव्य झाले. पुढे पुणे येथे खासगी वर्गांत शिक्षण घेऊन खात्याची इंजिनियरिंग सुपरवायझर ही स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण केली व पदोन्नती मिळवली. या महत्त्वाच्या वळणावर पत्नीकडून मिळालेले सहकार्य निर्णायक महत्त्वाचे ठरले असे ते आवर्जून सांगतात. पुढे यथावकाश खात्याच्या आणखी परीक्षा उत्तीर्ण करुन साहायक अभियंता आणि जिल्हा मंडळ अभियंता या पदोन्नती प्राप्त केल्या. नोकरीच्या निमित्ताने मध्यप्रदेश, गुजरात व मुंबई येथे वास्तव्य घडले. यांच काळांत जीवनाचे जवळून घडलेले दर्शन व त्यावरील स्वतःचे चिंतन यांतूनच त्यांनी आनंदमय जीवनाचा सहजमार्ग' हे पुस्तक लिहिले आहे. निवृत्तीच्या काळांत जीवनविषयक आणखीही काही पुस्तके लिहिली. आपणाला जीवन जसे दिसले, तसे ते वाचकांना पुस्तकांतून सांगणे हा त्यांच्या लेखनाचा हेतू असतो. सध्या लेखन, वाचन व चिंतन यांत लेखक आपला निवृत्तीचा काळ आनंदाने व्यतीत करीत आहेत.
उत्कर्ष प्रकाशन
उत्कर्ष प्रकाशन
पुणे- ४११००४