कादंबरीचे अंतरंग...
पण गेंड्याच्या कातडीचा तात्या जमकर डोईवरची तिरकी टोपी हातात घेत दात काढून फक्त हसला. तात्या जमकर गावातल्या समाजवादी पक्षाचा म्होरक्या होता. “वर्षातून एखादं शिबिर घेतलं, एकदोन मिरवणूक मोर्चे काढले आणि पक्षाच्या तोंडावर हजार - पाच हजार रुपये फेकले की समाजवादी म्हणून नाना धंदे करायला तू मोकळा.” अशा भाषेत बंडुनाना त्याला उडवून लावीत असत. त्याच रागाने तो म्हणाला, “बंडुनाना, तुम्हांला समाजवादाची कावीळं झाली आहे.” आणि शिष्टपणाने विचारू लागला, “बंडुनाना, एवढ्या पुढच्या गोष्टी करायला आपण टिळक
आहोत की सावरकर ?”
"अरे, त्यांची नावं सुद्धा तोंडात धरण्याची तुमची लायकी नाही आणि हे बघ तात्या – ” आणि तात्याचा चेहरा समोर धरून थेट त्याच्या डोळ्यांत नजर घुसवीत बंडुनाना म्हणाले, “माझं म्हणशील ना? तर मी नखाएवढा का होईना, पण टिळक आहे आणि केसाएवढा असेन, पण सावरकर सुद्धा आहे!”