मुस्लीम वा ख्रिश्चन धर्मातील व्यवस्थेनुसार एक प्रेषित, एक धर्मग्रंथ, एक धर्मगुरू आणि त्यांचं सगळ्यांनी ऐकायचं. आपली व्यवस्था तशी नाही. आपल्याकडे हजारो ग्रंथ आहेत. त्यापेक्षा अधिक गुरू आहेत. त्यामुळे एका ग्रंथानुसार किंवा एका गुरूच्या आदेशानुसार वागण्याचा प्रश्न आपल्या समाजात उद्भवत नाही. प्रेषिताची कल्पनाच आपल्याकडे नाही. 'देवाच्या सूचना किंवा आदेश आपल्यापर्यंत पोचवणारा प्रेषित नावाचा मध्यस्थ' आपल्याला लागत नाही. आपण समाजातील सगळ्यांच्या अस्तित्वाचा, जगण्याचा, मोकळेपणाने वावरण्याचा, पोट भरण्यासाठी काम करण्याचा, आपल्याला मान्य असलेल्या विचारांचा मुक्त प्रचार व प्रसार करण्याचा समान अधिकार मान्य करतो. अब्राहमिक धर्म आणि विचार हा समान अधिकार मान्य करत नाहीत. कम्युनिझम हा सुद्धा वेगळ्या अर्थाने अब्राहमिक विचारच आहे. तो देखील वेगवेगळ्या विचारांच्या सहअस्तित्वाला मान्यता देत नाही. आपण जो बहु तत्त्ववाद मानतो तो विचार कोणत्याही अब्राहमिक विचार व आचाराला मान्य नाही. ते 'एकतत्त्ववादा'च्या नावाखाली एकाधिकारशाहीचा पुरस्कार करतात. बहुतत्त्ववाद मान्य नसलेल्या या लोकांच्या किंवा शक्तींच्या दृष्टीने भारत आणि हिंदू धर्म हे त्यांना आव्हान आहे. हा विचार व ही विचारपद्धती वापरणारा समाज संपवणे ही त्यांची गरज आहे. कारण भारतातील हिंदू धर्माचा प्रभाव जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत त्यांचा एकतत्त्ववाद, त्यांची प्रच्छन्न एकाधिकारशाही जगात प्रस्थापित होत नाही आणि हे जग त्यांच्या ताब्यात येत नाही. भाषा कुठलीही असो - एकाधिकारशाहीसाठी, हे जग सर्वंकषरीत्या ताब्यात घेण्यासाठी हे सगळे चालू आहे.