प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे आविष्कृत होत असतो. कुणी गायनातून, कुणी चित्रातून, कुणी अभिनयातून. मला लेखनातून आविष्कृत व्हायला आवडतं. मला माझी निराशा, ते दुःख, ते भोगणं घेऊन लेखनातून व्यक्त व्हायसं वाटलं, म्हणून मी लिहिलं. ते दुःख तुमच्या सोबत वाटून घ्यावसं वाटलं, म्हणून मी लिहिलं. इतक्या जणांत वाटल्यामुळं ते दुःख आता जवाएवढंच उरलयं.
हे सगळं वाचून माझ्यासारख्या अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना आपलं दुःख सोसण्यासाठी थोडं जरी बळ मिळालं तरी माझ्या सोसण्याचं आणि लिहिण्याचं सार्थक झालं असं मला वाटेल.
तुमच्यासारखीच एक सर्वसाधारण आयुष्य जगणारी स्त्री जेव्हा एका असाधारण अशा संकटात सापडते तेव्हा तिचं काय होतं हे तुम्हाला सांगावंसं वाटलं, ते मी सांगितलंय.