आदर्श शिक्षण मंडळीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन या संस्थेचे संचालक आणि सध्या पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता (डीन) डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांच्या महाविद्यालयीन आणि पदव्युत्तर स्तरावरील प्रदीर्घ अशा पंचेचाळीस वर्षांच्या शैक्षणिक सेवेत त्यांनी अनेक अधिकारपदांवरुन काम केले. पूर्वी वाणिज्य विद्याशाखेचे डीन म्हणून त्यांची दोन वेळा नियुक्ती झाली. अभ्यासमंडळाचे अध्यक्ष आणि विद्यापीठातील वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाचे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. अनेक शासकीय, निमशासकीय आणि औद्योगिक संस्थांमधून त्यांनी सदस्य, सल्लागार, अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष इत्यादी अनेक भूमिकांमधून काम केले आणि करत आहेत. राष्ट्रीय उत्पादन क्षमता मंडळ, कामगार शिक्षण मंडळ, भारतीय प्रशिक्षण आणि विकास मंडळ, महर्षी कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिस आणि इतर अनेक व्यावसायिक व्यवस्थापनाशी संबंधित मंडळांवर आज अनेक वर्षे ते सक्रीय सहभाग देऊन पदाधिकारी म्हणून काम करीत आहेत.
डॉ. शेजवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत ७० विद्यार्थ्यांनी PH.D. पदवी संपादन केली आहे. त्यांनी सुमारे पंचवीस पाठ्यपुस्तके आणि सहाशेच्यावर विचारप्रधान लेख लिहिले आहेत. "प्रसाद" मासिकात फेब्रुवारी १९५९ पासून आजतागायत अखंडपणे ३९ वर्षे ते लेखन करीत आहेत. सुसंवाद साधणे हा त्यांचा आवडता छंद. त्यामुळे त्यांची सार्वजनिक व व्यावसायिक अशी साडेतीन हजाराच्यावर भाषणे झाली आहेत.
दिल्लीच्या अखिल भारतीय व्यवस्थापन संस्थेने आणि अखिल भारतीय विपणन संस्थेनेही यापूर्वीच त्यांना "फेलो" या सन्मानपूर्वक वर्गातील सदस्यत्व दिले आहे. पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे ते सध्या अध्यक्ष आहेत. युनिव्हर्सिटी ग्रॅन्टस् कमिशनच्या वाणिज्यविषयक तज्ज्ञांच्या मंडळावर त्यांची पुनर्नियुक्ती झाली आहे.
डॉ. शेजवलकर यांना पुणे विद्यापीठाने “वाणिज्य आणि व्यवस्थापन" विषयाचे प्रतिष्ठित प्राध्यापक (प्रोफेसर एमेरिटस्) म्हणून सन्मानित केले आहे. पुण्यातील औद्योगिक व्यवस्थापन संस्थेच्या मंडळाने १९९१ मध्ये शिक्षकदिनी त्यांचा गौरव केला होता. पुण्याच्या रेसिडेन्सी क्लबनेही त्यांना "पुणेज प्राईड अॅवॉर्ड" आणि मानपत्र दिले आहे.