मंदा खांडगे या गेली अनेक वर्षे साहित्याच्या विविध प्रांतात लेखन आणि संपादन करत आहेत. 'बहुआयामी' हा त्यांच्या निवडक अभ्यासपूर्ण लेखांचा संग्रह.
ललित गद्य लिहिणाऱ्या मंगेश पाडगावकर, डॉ. आनंद यादव, मधु मंगेश कर्णिक या ज्येष्ठ लेखकांच्या ललित गद्याविषयी लिहिताना लेखिकेने चिकित्सक अभ्यासकाच्या भूमिकेतून त्यांच्या साहित्याचे पदर उलगडले आहेत. तसेच मालतीबाई बेडेकर, दुर्गाबाई भागवत या पुरोगामी विचारांच्या लेखिकांच्या साहित्यकृतींचाही वेध घेतला आहे.
कवयित्रीच्या कविता हा त्यांच्या अभ्यासाचा विषय तसेच लोकसाहित्य आणि बालसाहित्य हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत. या व इतर विषयांवरचे त्यांचे अभ्यासपूर्ण लेख चिंतनीय आणि मननीय आहेत.
या लेखनाविषयी डॉ. खांडगे म्हणतात. "गेल्या अनेक वर्षांत असे अभ्यासपूर्ण लेखन करताना विविध विषय हाताळता आले. लेखनाचे आंतरिक समाधान तर लाभलेच पण मी वाचनसमृद्धही झाले. 'बहुआयामी' वाचताना, आस्वादताना वाचकही वाचनसमृद्ध होतील.