‘‘गिफ्टेड हॅन्डस्’’ (दैवी हात) हे डॉ. बेन कार्सन यांचे आत्मचरित्र आहे. यापूर्वी त्यांनी खास तरुण वर्गाला नजरेसमोर ठेवून लिहिलेले “थिंक बिग’’ या पुस्तकाचे भाषांतर मी केले व ते सप्टेंबर २०१२ मध्ये प्रकाशित झाले. त्याचे उत्तम स्वागत झाले.
“गिफ्टेड हॅन्डस्” या आत्मचरित्रात डॉ. कार्सन हे आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनावर अधिक प्रकाश टाकत आहेत. त्यांनी केलेल्या काही अवघड शस्त्रक्रियांची माहिती त्यांनी अधिक सविस्तर इथे दिली आहे. मारांडा या मुलीवरील उपचार तसेच जर्मन जुळ्यांचे विभक्तिकरण याविषयीचे त्यांचे अनुभव थरारक आहेत. विशेष म्हणजे त्यांचा स्वभाव इतका विनयशील आहे कि ते त्या त्या शस्त्रक्रियातील यशाचे श्रेय त्यांना त्यांना मदत करणाऱ्या ७० हून अधिक सहकाऱ्यांना देतात. अशा सांघिक कामगिरीशिवाय यश मिळत नाही व त्यांत तज्ज्ञ डॉक्टरांइतकेच साधीसाधी कामे करणाऱ्यांचे काम अधिक महत्त्वाचे असते हे ते आवर्जून सांगतात. व्यावसायिक तसेच कौटुंबिक जीवनात त्यांना आलेले अनेक अनुभव, मनुष्यस्वभावाचे नमुने, बालपणातील जीवन घडवण्यत आईने दिलेले योगदान वगैरेंचे वर्णन खरोखरच हृदयस्पर्शी आहे. आईवरील त्यांचे अतोनात प्रेम व देवावरील श्रद्धाही जागोजागी प्रतीत होत आहे. पुस्तकातील धार्मिक विचार मूळ लेखकाचेच आहेत. एकूणच एखाद्या व्यक्तिचे व्यक्तिमत्त्व कसे खुलू शकते व त्यांतून समाजाचा कसा फायदा होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. बेन कार्सन असे म्हटले तर वावगे होणार नाही.
पहिल्या पुस्तकाप्रमाणेच याही पुस्तकाचे भाषांतर करून पुस्तक छापण्यास ‘‘झोंडेरवान’’ या मूळ इंग्रजी पुस्तकांच्या प्रकाशनांनी परवानगी दिली. त्यांचा मी आभारी आहे. या पुस्तकाचा ‘‘थिंक बिग’’ पेक्षा वेगळे म्हणजे इथे डॉ. कार्सन यांनी आपल्या वैद्यकीय व्यवसायाविषयी अधिक सविस्तर लिहीले आहे. त्यांत अनेक शस्त्रक्रियांची, रुग्णांच्या आजारपणाची वर्णने आहेत. त्यांत अनेक वैद्यकीय संज्ञा आलेल्या आहेत. मी मूळात वैद्यकीय डॉक्टर नसल्याने त्या अर्थ समजावून घेणे व मराठी भाषांतर करताना त्यांत अचूकता असणे यासाठी मला पुण्यातील सुप्रसिद्ध पेडिआट्रिक न्यूरोसर्जन व माझे शाळकरी जीवनापासूनचे स्नेही डॉ. गोविंद दातार यांनी भरपूर मदत केली. त्यांचा मी आभारी आहे. उत्कर्ष प्रकाशनाचे श्री. सुधाकर व सौ. सविता जोशी यांनी हेही पुस्तक प्रसिद्ध करण्यात पुढाकार घेतला व त्यांची कन्या सौ. गौरी हिनेच या दोन्ही पुस्तकांच्या भाषांतरास चालना दिली. त्यांचाही मी आभारी आहे. पुस्तक निर्मितीस सहाय्य केलेल्या अन्य सर्वांचाही मी आभारी आहे.
वाचकांना हे पुस्तकही वाचनीय वाटेल अशी आशा आहे.
- डॉ. सुधीर राशिंगकर