शरद तळवलकरांचा कला क्षेत्रातील प्रवास खूप प्रदीर्घ आहे. त्यामुळे त्यांना अनुभवही भरपूर व विविध प्रकारचे आले आहेत. मित्रांच्या मैफलीतून त्यांनी वेळोवेळी सांगितलेले मजेदार किस्से आणि कथा ऐकायला मिळणे ही एक मेजवानीच असते. या साऱ्या कथा त्यांनी दैनिक 'लोकसत्ता' मधून 'गुदगुल्या' या शीर्षकाखाली शब्दबद्ध केल्या आहेत. त्याच आता त्याच नावांसह ग्रंथस्वरुपात प्रसिद्ध होत आहेत. या आठवणी ऐकताना किंवा वाचताना त्यांच्या जबरदस्त स्मरणशक्तिचेही कौतुक करावेसे वाटते. प्रत्येक प्रसंग, स्थळ, वेळ, वातावरण व संबंधीत व्यक्ति यांचे चित्रण बारीक सारीक तपशीलानिशी ते करतात तेव्हा आश्चर्यच वाटते. शरद तळवलकरांना मिळालेली लोकप्रियता आणि प्रतिष्ठा ही त्यांच्या जीवनाची भरजरी किनार आहे. हसत हसत जगणे व इतरांना हसवणे हे त्यांचे जीवन विषयक तत्वज्ञान आहे आणि ते त्यांनी यशस्वीपणाने सार्थ करून दाखवले आहे. त्यांच्या या पुस्तकातील आठवणी कांही हसऱ्या आणि कांही बोचऱ्या असल्या तरी त्या निश्चितच गुदगुल्या करणाऱ्या आहेत !