ज्ञानोबा-तुकोबांच्या वाङ्मयाच्या अभ्यासातील सातत्य वारकरी संप्रदायाने मात्र अबाधित ठेवले आहे. वैकुंठवासी विष्णुबुवा जोग महाराजांनी १०० वर्षांपूर्वी आळंदी येथे स्थापन केलेल्या वारकरी शिक्षण संस्थेतील कालबद्ध व शिस्तबद्ध अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडणारे विद्यार्थी मोठेपणी ज्ञानेश्वरीचे थोर प्रवचनकार होतात. याकडे मुद्दाम लक्ष वेधावेसे वाटते. विद्यापीठातून बाहेर पडणाया स्नातकांनी देखील संत वाङ्मयाच्या अभ्यासाचे सातत्य ठेवल्यास ते देखील प्रवचनकार होऊ शकतील. यात संदेह नाही. त्यासाठी मराठीतील थोर व्यक्तींनी प्रचंड लेखन केलेले आहे. सर्वश्री कै. सोनोपंत अथवा प्राचार्य शं. वा. दांडेकर, धुंडामहाराज देगलुरकर, नागपूरचे डॉ. शं. दा. पेंडसे व श्री. ना. बनहट्टी, पुण्याचे हेमंत विष्णु इनामदार यांच्या लेखनाचे परिशीलन केल्यास ज्ञानेश्वरी समजणे अवघड नाही असे प्रांजलपणे म्हणावेसे वाटते.