श्रीयुत अक्षीकरांच्या या पुस्तकाचं नाव 'रिकामपणाचे उपद्व्याप' असं असलं तरी प्रत्यक्षात हे पुस्तक म्हणजे 'रिकामपणी सुचलेले उत्तम 'विचार' या स्वरूपाचं आहे. आपल्या अवतीभोवती म्हणजे कुटुंबात, समाजात, आपण जिथं काम करतो त्या कार्यालयात किंवा अन्य ठिकाणी काहीतरी घडत (अन् बिघडतही) असतं. श्रीयुत अक्षीकरांसारख्या संवेदनशील स्वभाव असणाऱ्या व्यक्तीवर त्याचे अनुकूल-प्रतिकूल पडसाद उमटत असतात. मग त्यांचा मनोव्यापार सुरू होतो आणि लिहिल्याखेरीज त्यांची सुटका नसते. या प्रक्रियेतून हे सारे ललितलेख लिहिले गेलेले आहेत. या ललितलेखामागे 'अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी' हीच एक प्रेरणा आहे. हे सारे अनुभव सर्वसामान्य माणसांच्या नेहमीच्या जीवनातले असल्याने वाचकाची “अरे! यांनी तर माझ्याच मनातलं लिहिलंय” अशी सहज प्रतिक्रिया होईल आणि तो हे सारं लेखन 'आपलेपणा'नेच वाचत राहील. ताप्तर्य, मुद्दाम 'रिकामपणा' शोधून हे पुस्तक वाचण्याचा 'उपद्व्याप' केल्यास वाचकाच्या पदरी सहजसुंदर असे काही वाचल्याचा आनंदच पडणार आहे. म्हणूनच वाचकांसाठी या पुस्तकाची मुक्त कंठाने शिफारस करावीशी वाटते.