जगाला आपण 'हवं' असावं अशी पुष्कळांची इच्छा असते. लोकांच्या प्रेमाची त्यांना गरज असते, लोकांनी आपल्या पाठीवर शाबासकीची थाप टाकावी याची त्यांना भूक असते. यश तर सगळ्यांनाच हवं असतं. पैसा कमी पडतो ही चिंता नको असते. जीवनात आपण काही साध्य केलंय हे समाधान हवं असतं. मन प्रगल्भ व्हावं असं वाटतं. कठीण प्रश्नांची सोडवणूक करायची तर तारतम्य, शहाणपण, प्रौढ मन यांची गरज असते. होय ना ? मग हे सारं कसं मिळवावं याचं ज्ञान हे पुस्तक वाचून तुम्हाला होईल. शरीरानं व मनानं जे आजारी असतील त्यांना सुटकेचा मार्ग हे पुस्तक दाखवील. अपयशी लोकांना ते यशाचा मार्ग दाखवील. अडाणी माणसाच्या हातात ते एक ज्ञानदीप देईल. सुख, संपत्ती, सुज्ञपणा कसा मिळवावा त्याचा हा एक मार्गदर्शक मूलमंत्रच आहे असं समजा. पण एखादा मूलमंत्र मिळणं एवढंच पुरेसं नसतं. सुखी जीवनासाठी एखादा नकाशा देऊन हे पुस्तक थांबत नाही. जगात वागताना कुठं, काय, कसं चुकलं ते उलगडून सांगायचं ते काम करतं. झालेल्या चुका दुरुस्त कशा कराव्या ते हे पुस्तक तुम्हाला सांगतं. ते एक नकाशा तुम्हाला देतं, पण त्याचा फळप्राप्तीसाठी कसा उपयोग करावा हेही समजावून सांगतं. एका परिपूर्ण जीवनाचा, समाधानी आयुष्याचा, यशानं संपन्न असलेल्या जीवनाचा अहेर ते तुम्हाला करतं.