स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे साहित्य हा महोदधी आहे. त्यात अवगाहन करून त्याचे स्वरूप यथार्थपणे सांगणे ही गोष्ट सामान्यतः दुष्करच होय. सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक घटक कोणते; आणि त्या घटकांचा आविष्कार त्यांच्या बहुविध साहित्यात कसा होतो, हे दाखविण्याची पद्धत डॉ. प्र. ल. गावडे यांनी प्रस्तुत ग्रंथात अवलंबिली आहे. त्यामुळे त्यांच्या विवेचनाला शास्त्रशुद्ध रूप आले आहे. सावरकर साहित्यातून प्रतीत होणारे त्यांचे सुसंगत, सूत्रबद्ध व एकजिनसी तत्त्वज्ञान लेखकाने येथे सिद्ध करून दाखवले आहे. डॉ. गावडे यांच्या मनात सावकरांच्या साहित्याबद्दल गाढ भक्ती आहे. पण तरीही त्या साहित्याचे मूल्यमापन करताना आंधळ्या भक्तीने काहीही लिहिलेले नाही. वस्तुनिष्ठ दृष्टीने त्यांनी चिकित्सा केली आहे. सावरकरांच्या साहित्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे उज्ज्वल दर्शन कसे घडते, ते दाखवणे हा या ग्रंथाचा मुख्य विषय आहे. आपला हा हेतू डॉ. गावडे यांनी उत्तम रीतीने सिद्धीस नेला आहे.
- डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे
सावरकर
एक चिकित्सक अभ्यास