श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे विनोदाच्या वाटेला गेलेले मराठी साहित्यातील आद्य विनोदकार. पुढील काळातील राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे आदी प्रख्यात विनोदकारांचे गुरुवर्यच म्हणा ना. अतिशयोक्ती हा त्यांच्या विनोदाचा महालंकार. एकदा ते आपल्या साळसूदतेच्या बुरख्यातून अतिशयोक्तीच्या वाटेला लागले की त्यांना आवर घालणे प्रत्यक्ष परमेश्वरालाही अवघड. त्यांची ती वाट म्हणजे वाचकांची हसून पुरेवाट. ते त्या हास्यपुरात सापडलेच म्हणून समजा. असे असूनही त्यांच्या विनोदाच्या वाटेला पांचटपणा, बाष्कळपणा,सवंगपणा यांची जाण्याची छाती होत नाही. शंभर वर्षांपूर्वीच्या समाजातील सनातनी धर्मविचार, खुळ्या समजुती,अंधश्रद्धा यांची त्यांनी उडवलेली टिंगल-टवाळी आजही पारायणे करावी अशा तोडीची आहे. सनातन्यांवर कोरडे ओढताना आपण कोरडे राहण्याची त्यांची चलाखी तर मत्कुणांनाही मागे सारणारी वाटते. तेथे कर माझे जुळती, दुसरी बात नाही.