लेखिका सी ऑफ गॅलिलीच्या काठावर मागे दिसणाऱ्या गोलन हाइटस टेकड्या ज्योती दाते गेली चाळीस वर्ष पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून महाराष्ट्रातील निरनिराळ्या वृत्तपत्रांमधून व नियतकालिकामधून सातत्याने लेखन करीत आहेत. त्यांची "वेध व्यक्तित्वांचा", "मनस्वी ते यशस्वी" व "रामूभैय्या दाते - एक आनंदप्रवाह” ही पुस्तके रसिकांच्या पसंतीला उतरलेली आहेत. ज्योती दाते ह्या सुप्रसिद्ध लेखक कै. वसंत वरखेडकर यांची कन्या असल्याने लहान पणापासूनच त्यांचा साहित्य विश्वाशी निकट परिचय घडलेला आहे. कथ्थक नृत्याची साधना तसेच नृत्य विशारद पदवी प्राप्त करून त्यांनी नागपूर विद्यापीठातून बी.ए. व बी.जे. (Bachlor of Journalizm) तसेच मुंबई विद्यापीठातून एम्. ए. (Sociology) ह्या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. संगीतकार रवी दाते यांच्या पत्नी असल्याने संगीत कला विश्वाशी त्यांचा सतत संपर्क राहिलेला आहे व रसिक आणि जिज्ञासूवृत्ती जोपासली गेली आहे. ज्योती दाते यांना प्रवासाची मनापासून आवड असून, देशी-विदेशी केलेल्या भटकंतीतील त्यांना विशेष भावलेले वैशिष्ठ्यपूर्ण प्रवासानुभव त्या वेळोवेळी शब्दबद्ध करून प्रसिद्ध करीत आलेल्या आहेत. अलास्का, हवाई, तुर्कस्थान, रशिया, ब्रह्मदेश जॉर्डन इस्त्रायल अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांची ओघवत्या शैलीतील रोचक प्रवासवर्णने ह्या संग्रहात सादर करण्यात आलेली आहेत. लेखिकेच्या चित्रदर्शी वर्णनांमुळे लेखांना अभिजात दर्जा प्राप्त झालेला असून त्या त्या स्थळांना प्रत्यक्ष भेट दिल्याचा आनंद रसिक वाचकांना या पुस्तकातून भरभरून मिळू शकतो.