इंडस्ट्री ४.०, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन रोबोटिक्स व डेटा अॅनालिटिक्स हे उद्याच्या तंत्रजीवन पद्धतीचे अविभाज्य घटक असतील. ह्या क्षेत्रातील सतत बदलणारे तंत्रज्ञान आपल्या जगण्याच्या कल्पनाच बदलेल. कल्पनांचा हा वेग येत्या दहा पाच वर्षात अधिकच वाढणार आहे. तो अधिक सर्वव्यापी तर होईलच पण ज्या पैलूंमधे बदल दिसण्याची आपण कल्पना केली नव्हती अशा ठिकाणी तो आढळेल. आपले वैयक्तिक जीवन, व्यवसाय, व्यवहार, सामाजिक संपर्क ह्या सर्व बाबी बदलणार आहेत. अगदी सरकारी दरबारी नोंद होऊन अनेक विभाग कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करायच्या योजना आखत आहेत. फॉरेस्टर या प्रथितयश तंत्रवेत्त्या उद्योगाने सर्वेक्षणानंतर असे भविष्य वर्तविले आहे की २०२१ नंतर बुद्धिमान संगणक व रोबोटिक्समुळे किमान ६० लाख रोजगार नष्ट होणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञान कायमच काही रोजगार कमी करते व काही नवनिर्माण करते. प्रशिक्षीत व मूल्यवर्धन करणारे तंत्रसमृद्ध मनुष्यबळ अजूनही हवे पण खालच्या दर्जाचे सहाय्यक मात्र हळूहळू हद्दपार होत आहे. ह्यासाठी कौशल्यवृद्धी उपक्रम सर्व वर्गातील घटकांसाठी हाती घ्यायला हवेत. विशेषतः विद्यार्थी व व्यावसायिकांनी हे स्थित्यंतर लक्षात घेतले पाहिजे. पुण्यातील एक नामवंत विचारवंत प्रख्यात संगणकतज्ज्ञ, लेखक डॉ. दीपक शिकारपूर ह्यांनी " कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्रमानव” ह्या विषयावर ३८ वे पुस्तक लिहिल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. ह्या पुस्तकाचा नव्या पिढीला व सर्व समाजाला फायदा होईल.