मुळात बाजूच्या माणसाबद्दल ममत्व. त्यात त्या माणसात वेगळेपण जाणवलं तर माझे कान टवकारतात. भोवताली घडणारी घटना 'नॉर्मल' नाही, हे जाणवण्या इतपत नजर सतत 'दक्ष' असते. त्यामुळे रोजच्या दैनंदिनीतला क्षण ताजातवाना राहतो. अनोख्या अनुभवांची भर पडत जाते. पत्रकारितेच्या पार्श्वभूमीमुळे चौकस वृत्ती अंगभूत दडलेलीच असते. छोट्या छोट्या प्रश्नांतून माणसं उलगडतात.
घटनांच्या मुळाशी जाता येतं. क्षणात क्षणांचं वेगळ रुप समोर येतं. रोजच्या रोज डायरीत नोंद करायचो.
'लोकसत्ता'त रोज स्तंभ लिहायची वेळ आल्यावर हे सारं नोंदविलेलं स्तंभांकित केलं.
बागेतल्या हुकमी हसण्यांच्या क्लबपासून, शाकाहाराच्या लाटेपर्यंत... हास्यास्पद घटनांवर कधी नानाकाकांच्या नजरेतून भाष्य केलं, तर कधी मीच थेट टिप्पणी केली. कल्याणजी भाईसारख्या संगीतकारापासून ते मालतीबाई किर्लोस्करांपर्यंत व्यक्तींवर निमित्तानं, चार ओळी लिहिल्या. कधी 'मॅन्सवर्ल्ड' सारख्या फक्त पुरुषांसाठी असलेल्या मासिकाची ओळख करून दिली तर कधी रस्त्यावरच्या विक्रेत्यांचे गमतीचे 'नाद' शब्दबद्ध केले. अडवणूक करणारे रिक्षावाले स्वयंस्फूर्तीनं 'बाग फुलवताना पाह्यल्यावर त्यांना 'दाद' ही दिली. तर बुलढाण्याचा गाणप्रेमी मित्र अचानक जिल्हापरिषद अध्यक्ष बनून सामोरा आल्यावरची भावनाही नोंदविली. खाणं खिलवता खिलवता शब्दांचा धबधबा ओसंडवणारा गिरगावातला शेखर टेंबे आणि न बोलता 'अगत्य' साधणारे माधवाश्रमाचे महाजन ही एकाच परिसरातल्या खाणं खिलवणाऱ्या दोघांची परस्परविरोधी रुपं चितारली. विषयाला क्रम नाही, शिस्त नाही, जसं अनुभवलं तसं वाचताना तुमचा 'क्षण' मजेत जाईल.
सुधीर गाडगीळ