शून्यातून सूर्याकडे' ही मृत्यूशी झुंज देणाऱ्या फिनिक्सच्या उड्डाणाची वास्तव कहाणी आहे. जिवघेण्या भीषण अपघाताच्या संकटानं खचून न जाता दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रखर आशावाद, कमालीची जिद्द व दुर्लभ सहनसिद्धी या भक्कम खांबांवर उभी असलेली ही यशोगाथा आहे. ही कहाणी म्हणजे भावनांची उत्कट अभिव्यक्ती आहे. ही कहाणी केवळ वेदना, संकटं, दुःखं सांगणारी नाही, तर संकटावर स्वार होऊन यशाच्या शिखराकडे झेपावणाऱ्या जिद्दीची कहाणी आहे. संकट म्हणजे भगवंताचं रूप, या रूपाच्या दर्शनानं जगण्याचं नवं, डोळस भान येतं. संकटरूपी आकाश कोसळलं तर तेच पायाखाली घेऊन ताठ मानेनं जगायचं. प्रतिकूलतेचं प्रखर वास्तव मान्य करून अनुकूलतेचं स्वप्न रंगवायचं, ध्येयाकडे झेप घ्यायची. त्यासाठी अपार कष्ट, अविरत प्रयत्न, गो बियाँड फेल्युअर या त्रिसूत्रीचा अवलंब करायचा. आपल्या प्रत्येकाचं जीवन म्हणजे संघर्षाची कहाणी आहे. भूतकाळाची चक्रं आपण उलटी फिरवू शकत नाही, पण भविष्यकाळाला वळण लावणं आपल्या हातात असतं. 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार'- म्हणजे वास्तव शांतपणे मान्य करून स्वतःला स्वतःची झालेली खरी ओळख! उत्कर्ष प्रकाशन