हे पुस्तक म्हणजे माझ्या ज्ञात आणि अज्ञात वाचकांशी होणारा एक प्रेमळ संवाद आहे. माणसे जोडत रहावीत, त्यांच्याशी हसत खेळत संवाद साधावा हा माझा फार पूर्वीपासूनचा छंद. यामुळे समाजातील सर्व घटकांमधील अनेक जणांशी माझा जवळून परिचय झाला. त्यात माझे विशेष लक्ष गेले ते ज्यांनी लहानपणापासून प्रचंड परिश्रम घेऊन आत्मविश्वासाने आपल्या आयुष्यात उंच भरारी घेतली त्यांच्याकडे. ही माणसे माझ्या कायम लक्षात राहिली. यातील अनेक जण समाजातील वंचित, शोषित आणि काही दलित असे आहेत. त्यांनी शून्यापासून सूर्याकडे झेप घ्यावी इतका पराक्रम आयुष्यात केला. तसे म्हटले तर ही माणसे सामान्य होती. ती पराक्रमाने मोठी झाल्यावर देखील त्यांना प्रसिद्धीचा सोस नव्हता.
या पुस्तकात मी दिलेल्या जवळजवळ सर्व व्यक्तींमध्ये सुप्त गुण आहेत. त्यांनी सुप्त गुण ओळखून, ते वाढवून आणि त्याचा उपयोग स्वतःसाठी आणि समाजासाठी कसा केला त्याची ही मनोरंजक कहाणी आहे. मला हे लोक आवडले याचे कारण त्यांच्यातील व्यक्तीविशेष कमालीचे सर्जक होते. या सर्वांची धडपड संवेदनात्मकही आहे. अशी आणखी माणसे वाचकांनी शोधून काढावीत आणि त्यांच्या धडपडीचे रहस्य मला जरूर सांगावे. हा एक पुस्तक लिहिण्यामागचा हेतू आहे.
- प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर
प्रोफेसर एमिरिटस
पुणे विद्यापीठ, अध्यक्ष- आदर्श शिक्षण मंडळी