विठ्ठलराव रामचंद्र सपकाळ
संस्कृती, प्रकृती व विकृती या संबंधात एका प्रसिद्ध लेखकाने कथा स्वरूपात दिलेली व्याख्या इथे देत आहे. एका छोट्याशा गावात एक कष्टाळू शेतकरी राहत होता. त्याची शेती गावापासून दूर अंतरावर होती. तो दररोज सकाळी लवकर उठून आपली बैलजोडी घेऊन व भाकरी बांधून नित्यनियमाने शेतावर जात असे. असाच एकदा शेतात भरपूर कष्ट करून दुपारी भाकरी खाण्यासाठी बांधावर झाडाखाली बसला. भाकरी सोडून घास घेण्याच्या दरम्यानच तिकडून एक साधू जात होता. त्याने त्या शेतकऱ्याला खाण्यासाठी थोडी भाकरी मागितली. शेतकऱ्याला खूप भूक लागली होती. पण त्याने साधूकडे बघितले व त्याला वाटले की हा आपल्यासारखाच भुकेला आहे. तेव्हा त्या शेतकऱ्याने त्या साधूला जवळ बसवून आपल्या भाकरीतील एक भाकरी त्याच्या हातात ठेवली. त्याच्यावर सुकं कालवण जे होतं त्याचाही अर्धा भाग ठेवला व दोन कांद्यांपैकी एक कांदा त्या भाकरीवर दिला. त्या दोघांनी आनंदात भाकरी संपवली. लेखकाचे म्हणणे, त्या शेतकऱ्याने आपल्या जेवणातील अर्धे जेवण त्या साधूला दिले, त्याच्या त्या कृतीला संस्कृती म्हणायचे, पण जर त्या शेतकऱ्याने साधूच्या मागणीकडे दुर्लक्ष करून स्वतःच सगळी भाकरी खाल्ली असती तर त्याला प्रकृती म्हणायचे आणि त्या शेतकऱ्याला पहिल्या घासाच्या वेळी साधूने टोकले त्याचा राग आला असता आणि त्याने त्या साधूला दोन रट्टे देऊन त्याचा वाडगा आणि कमंडलू हिसकावून घेऊन त्याला हाकलून दिला असता तर त्याला विकृती म्हणायचे.
उत्कर्ष प्रकाशन
उत्कर्ष प्रकाशन पुणे ४ दूरध्वनी : ०२०-२५५३७९५८, २५५३२४७९