घट रिकामा दुःखद वैवाहिक जीवन विसरण्यासाठी व्यापक आशावाद गरजेचा आहे। आणि त्याचबरोबर माणसाने 'पूर्वग्रहदोषमुक्त दृष्टिकोन सुद्धा बाळगला पाहिजे, असं काहीसं 'बौड रसेल' म्हणतो. या त्यांच्या म्हणण्याचा लेखक श्री. भ. पुं. कालवे यांनी कादंबरीच्या सुरुवातीलाच आधार घेतला आहे. व्यापक आशावाद कोठून येतो आणि कसा मिळविता येतो, याबाबत आपल्या परंपरेत काहीएक चर्चा झाली आहे. उदाहरणार्थ- भवसागर । तरून जाणं सामान्य जीवाला अवघड. त्यातून तरून जाण्यासाठी मग । 'घट' सोबत असावा लागतो, अशी संकल्पना मांडलेली आहे. पण हा घट रिक्तही नसावा. तो सद्विचाराने आणि सत्कृत्याने भरावा लागतो. विश्वास आणि प्रेमाने भरावा लागतो. अहंकारशून्यतेनेही भरावा लागतो. तो रिकामा असेल तर भवसागर तरून जाणं दुष्प्राप्य, दुर्घट. हा घट भरलेला ठेवणं ही प्रत्येक विवाहित जीवाची एका अर्थाने आध्यात्मिक जबाबदारी असते. 'घट रिकामा' ही भ. पुं. कालवे यांची नवी कादंबरी ग्रामीण पार्श्वभूमी आणि सर्वसामान्यांच्या जीवनाबद्दल, 'घटस्फोट' या वेदनामयी दुर्घटनेबद्दल चिंतनशीलतेने निवेदन करते. दुःखपर्वाला संयमाने सामोरी जाते. विवाह हा 'जुगार' आणि घटस्फोट हा 'अग्निकुंड'- असं कादंबरीकार म्हणतो आहे आणि ते खरंदेखील आहे. पण घटस्फोटाची 'खरी' कारणं सहसा प्रकट होत नसतात. घटस्फोटामुळे सामाजिक व्यवस्था विस्कटते, पण व्यक्तींची आंतरिक व्यवस्थासुद्धा उद्ध्वस्त होत असते. समाजातल्या सामान्य जीवांना होरपळणारा हा विलक्षण विषय कालवे यांनी संयमाने हाताळला आहे. त्यातून सामान्य जीवांबद्दलची त्यांना वाटणारी करुणा आणि आस्था दिसून येते. याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि त्यांच्या लेखनाला शुभेच्छा.