काय म्हणता ? बाळाला बरं नाही ? बालकांना आपल्या भावना बोलून दाखवितां येत नसल्याने रडणें, झोपणें, खाणेपिणें इत्यादीवरून मातेला बालरोगाचा अंदाज बांधावा लागतो. अलीकडील विभक्त कुटुंबांतील राजाराणीच्या छोट्या संसारात वडिल अनुभविक मंडळींच्या अभावीं स्वयंपाका प्रमाणे बालसंगोपनातहि जे बरेवाईट प्रयोग अज्ञपणे चालू असतात त्यांचामुळे 'तुमचा खेळ होतो, पण आमचा जीव जातो' असे मनात म्हणण्याची बालकावर पाळी येते! तेव्हा अशा तरूण भगिनींना या पुस्तकाची विशेष मदत होईल. बालरोगांचे निदान व चिकित्सा करण्याच्या कामी डॉक्टरची मदत विशेष उपयुक्त असते हें खरें; परंतु सर्वच वेळीं नि विशेषतः खेडोपाडीं ती खास उपलब्ध होतेच असे नसल्याने या पुस्तकांत दिलेलीं रोगलक्षणें व साध्या उपाययोजना प्रसंगी मार्गदर्शक ठरतील असा विश्वास वाटतो. बाल्यावस्था हा आयुष्याचा पाया असून या वेळीं जडलेल्या कांही रोगांचे परिणाम जन्मभर भोगावे लागतात व अल्पायुष्य वाट्याला येण्याची भीति असते. आपल्या भारतांत आयुष्याची मर्यादा फारच कमी असून बालमृत्युचें प्रमाण तर भयंकरच आहे. अर्थात ही शोचनिय स्थिति सुधारण्याच्या कामी या पुस्तकाचा उपयोग वाचकांनी अवश्य करावा अशी शिफारस आहे.