लहान पणापासून स्वैपाकाची आवड असल्यानं उषाताईनी, आपल्या कॉलेज जीवनाची सांगता दिल्लीच्या लेडी इरविन कॉलेज सारख्या नावाजलेल्या शिक्षण संस्थेतून होम सायन्सचा कोर्स करून केली. पुढे लग्न झाल्यावर यजमानांच्या वायुसेनेतील नोकरीमुळे त्यांना देशाच्या निरनिराळ्या प्रातांत राहण्याची व तेथील वैशिष्ट्यपूर्ण पाककृतीचा अभ्यास करण्याची अमोल संधी मिळत गेली. यजमानांच्या निवृत्तीनंतर, पुण्यात स्थायिक होताच त्यांनी आपल्या या आवडत्या छंदाचा अधिक नेटाने पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला, व त्याची सुरूवात केली कुकिंग क्लासेस सुरू करण्यापासून. अत्यंत आनंदी स्वभाव, विषयाचं सखोल ज्ञान आणि शिकवण्याची हातोटी या त्यांच्या गुणांमुळे " दिल्लीच्या सौ. उषा पुरोहित " यांचे कुकिंग क्लासेस महिलांमध्ये लोकप्रिय ठरले आहेत. परंतू त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत, पुण्याच्या लोकप्रिय साप्ताहिक सकाळचे रुचीपालट हे सदर त्या गेली ५ वर्षे समर्थपणे चालवीत आहेत. सहाजीकच पुण्यांतली कोणतीही पाककृती स्पर्धा असली, की परीक्षक म्हणून त्यांना बोलावलं जातं. आपल्या या पहिल्या पुस्तकाच्या रुपानं, प्रथम, दीपावलीच्या शुभमुर्हतावर वाचकांची तोंड गोड करून देण्याचं त्यांनी ठरवलं आणि म्हणून ही मिठाई उषाताईच्या तर्फे, वाचकांच्या हातांत देताना आम्हाला आनंद होतो आहे.