तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे जगातील अब्जावधी लोकांच्या जीवनामध्ये फार वेगाने बदल घडताना आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. या सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानांमध्ये माहिती आणि संवादाचे तंत्रज्ञान (इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ICT) सर्वांत आघाडीवर आहे. यामुळे पूर्वी असलेले अंतराचे बंधन आता नाहीसे झाले आहे आणि आज सर्वांना सर्व प्रकारची माहिती मिळू शकते तसेच परस्परांशी गतिशील संवादही होऊ शकतो. अशा प्रकारे सर्व जग जोडले जाऊन 'ग्लोबल व्हिलेज' ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे. तंत्रज्ञानात्मक प्रगतीचा वेग सध्याच चक्रावून टाकणारा झाला आहे, असे आपण म्हणतो. सेलफोन, जीपीएस, इंटरनेट ॲन्ड नॅनो ऊर्फ सूक्ष्म तंत्रज्ञान यांच्या संगमातून एक अत्यंत वेगळ्याच प्रकारचे जग लवकरच आपल्या आसपास दिसू लागणार आहे. संगणकीय सूक्ष्मतंत्राचा प्रवेश प्रत्येक पैलूमध्ये झालेला आढळेल किंबहुना तो तसा असणे हेच आपण गृहीत धरू. इतक्या सहजपणे हा बदल होणार आहे. यामुळे ज्या बाबींची आपण आत्ता कल्पनाही करू शकत नाही त्या या तंत्रसंगमातून सहजशक्य होणार आहेत. या साधनांमुळे एक नवीन ई-जीवनशैली निर्माण होणार आहे. कोणत्याही विषयाची माहिती तर घरबसल्या मिळेलच परंतु त्याबरोबरच इतर अनेक सेवासुविधा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे जगभरात कधीही, कोठेही उपलब्ध होऊ लागतील. दुकानात न जाता खरेदी आणि बँकेत न जाता पैशाचे व्यवहार करणे यामध्ये विशेष असे काहीच राहणार नाही. संगणक व आयटी आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक तर राहणारच आहे. पण त्यापुढे जाऊन आपला वाटाड्या (मार्गदर्शक) व्हावयाचे स्थान मिळवेल यात मला तीळमात्र शंका वाटत नाही. या पुस्तकातील अनेक लेख भविष्याचा वेध घेणार आहेत, त्यात कल्पना रंजनाचा भाग खूपच छोटा आहे. अनेक विद्यार्थ्यांना त्यात आगामी करिअर संधी सापडतील. अनेक बाबींवर भारतात संशोधन व्हायला हवे. खर तर हे पुस्तक लिहायचा हाच खरा हेतू आहे.