यशस्वी जीवनाचा मंत्र जाणायचा असेल तर रानातला झरा पाहा. त्याच्या पारदर्शी रूपातून दिसणारा निर्मळ तळ पाहा. नागमोडी वळणे घेत तो पुढे झेपावतोय. पुढे आणि पुढेच जाणे... हा त्याचा ध्यास आहे. वाटेत येणाऱ्या काट्याकुट्याच्या फांद्यांना तो आनंदानं सामोरा जातो. त्यांच्या भेटीने सुंदर तुषार उडतात. सूर्यकिरणामुळे ते तुषार तेजस्वी दिसतात. हाच झरा वाटेतील दगडधोंड्यावरही आदळतो. त्याचा छान आनंददायी आवाज येतो. मोठा धोंडा मधे आल्यावर समजूतदारपणानं कडेनं वाट काहतो; पण पुढेच जातो...
तरुणांनो ! असंच आयुष्य प्रभावी ठेवा. नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बना ! इच्छा असेल तर मार्ग दिसतो आणि प्रयत्नाने यश आणि यशच प्राप्त होते.... असे प्रेरणादायी विचार मांडणाऱ्या डीएसकेचं हे चरित्र आहे. 'आधी केले मग सांगितले' हा त्यांचा स्वभाव आहे.
त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. चणे, बोरे, भाजी विकली. पेपरची लाइन टाकली. दुकानांच्या पाट्या धुतल्या. टेलिफोन पुसायचा व्यवसाय केला. रंगकाम, घरदुरुस्ती हे व्यवसाय करत गृहप्रकल्प उभारण्याची गरुडभरारी मारली. ३०,०००च्या वर फ्लॅटच्या योजना पूर्ण केल्या. जगातलं सुंदर शहर बांधायची योजना सुरू केली. 'टोयोटा एजन्सी', 'ॲनिमेशन प्रॉडक्ट डिझायनिंग कॉलेज' असे अनेक व्यवसाय यशस्वी केले. भान ठेवून योजना आखल्या आणि बेभान होऊन पूर्ण केल्या. अशा भव्य स्वप्न पाहणाऱ्या आणि ती स्वप्नात उतरविणाऱ्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची ही यशोगाथा आहे. ज्याला आयुष्यात मोठं व्हायचंय त्यांच्यासाठी हे चरित्र प्रेरणादायी आहे.