साने गुरुजींचा सहवास लाभलेले आणि साने गुरुजींपासूनच प्रेरणा घेऊन बाल-साहित्य निर्मितीत गढलेले राजा मंगळवेढेकर ह्यांनी आजवर मुलांसाठी गोष्टी, गाणी, नाटुकली, चरित्रं, विज्ञानकथा, ललित इतिहास, झाडं-फुलं-पशू-पक्षी- कीटक.... ही मानवेतर सृष्टी शब्दबद्ध केली आहे. साने गुरुजींनी आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी आपली पुतणी सुधा हिच्या निमित्तानं सगळ्या मराठी मुलुखातील मुलांसाठी 'सुंदर पत्रे' लिहिली. त्याला आता पंचेचाळीस वर्षं झाली. राजाभाऊ हिंडते-फिरते. विविध तऱ्हेचा निसर्ग, लोकजीवन, समाजजीवन, प्रेक्षणीय स्थळं..... त्यांनी पुष्कळ पुष्कळ पाहिलेले, अनुभवलेले. त्यातूनच त्यांनी आपल्या 'प्रिय दीपा' व 'प्रिय सौमित्र' या नातवंडांच्या निमित्तानं सगळ्या मराठी बालमित्र-मैत्रिणींसाठी ही 'सुरेख पत्र' लिहिली. साने गुरुजींचा वसा पुढं चालवला !