गोमांतकांतील एका लहानशा खेड्यांत माझे बालपण म्हणजे तेरा चौदा वर्षांपर्यंतचे आयुष्य गेले. त्यानंतरचे आयुष्य सांगली, पुणे, नासिक, गोवा आणि पुणे असे वेगवेगळ्या शहरांतून गेले ते कसे गेले हे रेखाटण्याचा प्रयत्न मी या आत्मचरित्रांत केला आहे. या सर्व काळाचे सिंहावलोकन करताना, आज असे वाटते की स्वेच्छेने पूर्वनियोजन करून, निश्चितपणे काम करावयाचे ते ठरवून मी कांही केले आहे असे वाटत नाही. जगण्यासाठी आणि परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी जे जे करावे लागले ते ते करीत गेलो. आपत्ती आल्या बरे वाईट अनुभव आले अनेक चांगली मोठ्या मनाची माणसे भेटली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि मदतीमुळे मी शिक्षण पूर्ण करू शकलो. अनुभवांतून घडत गेलो. अनेक चुका केल्या. त्या चुकांचे परिणाम भोगले. पण पश्चाताप करत बसलो नाही. या सर्व प्रवासांत एक प्रकारची अनिश्चितता सतत जाणवत होती. सर्व प्रवासामध्ये माझ्या पत्नीने, सौ. सुमतीने मला सर्वतोपरी साथ दिली. कठीण प्रसंगात तिने मला धीर दिला. माझ्यांतील चुका निस्पृहपणे दाखवून दिल्या. माझ्या सोबत अनिश्चितता भोगली. या प्रवासांतच उत्कर्ष प्रकाशनाचे श्री. जोशी यांची गाठ पडली. त्यांनी माझी बरीच पुस्तके प्रकाशित केली. हे आत्मचरित्रसुध्दां त्यांच्यामुळेच प्रसिध्द होत आहे. त्यांचे ऋण मी मान्य करतो आणि त्या ऋणांतच रहाण्याचे मी पसंत करतो.