डॉ. दत्तात्रय पुंडे हे वाङ्मयेतिहासविद्या या विषयाचे अभ्यासक म्हणून सर्वाना परिचित आहे. ते कुसुमाग्रजांच्या साहित्याचे मर्मज्ञ अभ्यासक आहेत. वाङ्मयविषयक मूलभूत प्रश्न उत्पन्न करणारी, चौकस, सर्वसमावेशक आणि मुख्य म्हणजे विधायक समीक्षादृष्टी हा त्यांचा समीक्षालेखनाचा विशेष. या त्यांच्या विशेषाचा प्रत्यय 'वाङ्मयीन अवलोकन'मधूनही येईल. ‘वाङ्मयीन अवलोकन' या समीक्षासंग्रहातील केशवसुतांवरील लेख केशवसुतांच्या कवितेकडे पाहण्याची नवदृष्टी देणारे आहेत. बालकवी व इंदिरा संत यांच्या कवितांसंदर्भात, तसेच वि. शं. पारगावकर यांच्या कथासृष्टीसंदर्भात येथे रसास्वादात्मक समीक्षेचे उत्तम उपयोजन केलेले आहे. मराठीतील विनोदी लेखनाच्या मूल्यमापनाची एक नवदिशा डॉ. पुंडे यांनी या संग्रहात दाखविली आहे. केळकर-सावरकरांच्या आत्मचरित्रविषयक मूल्यगर्भ विचारांचे येथे केलेले परिशीलन अलीकडील आत्मचरित्रांच्या यथार्थ समीक्षेसाठी उपयोगाचे ठरणारे आहे. गांधीवाद हे एक थोर जीवनमूल्य. त्याचा मराठी साहित्यावरील प्रभावपरिणाम टिपताना डॉ. पुंडे मराठी साहित्याची संवेदनशील प्रकृतीच तपासून पाहतात. 'आविष्कार स्वातंत्र : कलावंताचे आणि सर्वांचे' या लेखाने या संग्रहाचे मोल वाढले आहे. 'वाङ्मयीन अवलोकन' मधील डॉ. दत्तात्रय पुंडे यांचे सर्वच समीक्षालेख विधायक समीक्षेच्या अंगाने जाणारे असल्याने अभ्यासकांना निश्चितच आवडतील.