"प्रश्न आहेत तसेच आहेत. सुटतील कालानुरूप पण मला शांत वाटतं आहे. कुणी माझ्या मनाला साथ द्यावयाला आहे. तुटून जाण्यासारखं वाटत होतं मला. अवि! एकट्या स्त्रीचे हात कमी पडतात, आयुष्यात येणारी दुःख झेलायला. स्त्रियांच्या कोमल हातांना बिल्वरांचा खळखळाट शोभून दिसत असेल, उठून दिसत असतील गोरे तळवे, नखं, सारं काही सौंदर्यमय शोभिवंत असेल. पण दुःखाच्या डोंगरावर चढणं किंवा यातना, वेदना, मनोभंग यांच्या दरीत उतरावयाचे असो, तिला लागतं साहचर्य ते पुरूषाचं, समर्थ हातांच.. स्त्रियांचे हात देवपूजा करतांना शोभून दिसत असतील, दोन्ही हातांत लहानसे चांदीचे ताम्हन घेवून त्यात निरांजन तेवत ठेवून ती भगवंताला ओवाळीत असतांना सभोवती मांगल्य, पवित्रता निर्माण करील असेल पण वाघाच्या जबड्यांत हात घालायला, दुःखाच्या दऱ्या चढतांना किंवा उतरतांना तिला जरूर असते ती पुरुषांची. ज्याच्या मनगटाच्या धमन्या पराक्रमाचं रक्त अभिसरण करीत असते अशा बलदंड साहसकर्त्याची. शक्य आहे पुरुषाचं मन कोमल असेल, हेही शक्य आहे की तो खूप दयावंत आहे. पण पराक्रमाच्या वेळी पुरुषार्थ नोंदविण्यासाठी त्याचेच हात उपयुक्त असतात. स्त्री पुरुषांना ओवाळते जेंव्हा त्याला रणांगणावर जायचे असते तेंव्हा काय असेलरे त्याचा अर्थ?" प्रभा बोलत होती. “काय असतो त्याचा अर्थ?" मी विचारलं. . "अवि! त्या निरांजनाच्या ओवाळल्या जाणाऱ्या मंद पण पवित्र प्रकाशांतून त्याच्या चेहेऱ्याभोवती प्रकाशाचं वलय काढलं जातं ना, तेंव्हा त्याच्या हाताच्या धमन्यातून वाहणारा रक्तप्रवाह उष्ण होतो आणि पराक्रमाची विजिगिषा त्याच्या मनात रुजू लागते. वेध लागतो त्याला विजयाचा आणि नेत्रांतील परावर्तित झालेली निरांजनेची किरणे त्याचं रक्षण करीत असतात. असंच असतं अवि! असंच असतं! असंच असतं." थांबली प्रभा बोलता बोलता. मला नेहमीच प्रश्न असे, प्रभाचा, काय हिचं हृदय भगवंताने कशानं घडवलं आहे? दया : आणि जिव्हाळासुद्धा कोणत्या गोडव्याने घडवला असेल? की जिच्यांतून ज्ञान आणि ज्ञानच 'ओघळत असतं... श्री. जयवंत कुलकर्णी यांच्या रंग जास्वंदींचे या कादंबरीतून...