पुढील काळात 'माझ्या जीवाची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी' या माउलींच्या आवडीप्रमाणं अनेक वर्ष मी आळंदी-पंढरपुरच्या वारीत वाटचाल करीत राहिलो. 'टाळी वाजवायची, गुढी उभारावी बाट। ती चालावी पंढरीची' या संत चोखोबांच्या अभंगाचा आनंद या वाटचालीत मिळत होता. पंढरीची अन् पंढरीनाथाच्या भेटीची ओढ किती उत्कट असते ते पहायचं असेल, तर या सोहोळ्याच्या वाटचालीत सहभागी व्हावं. सुमारे पंधरा, अठरा दिवसांच्या वाटचालीत हरिनाम गजराशिवाय अन्य विषय नसतो. टाळ मृदुंग, अभंगगायन अन् हरिनामाचे उच्चारण याशिवाय अन्य ध्वनी नसतो. 'पंढरीचे वारकरी । ते अधिकारी मोक्षाचे।' असा आध्यात्मिक आनंद प्रत्येकाच्या मनी दाटलेला असतो. 'वारकरी सांप्रदायिक भजनी मालिकेने' लावलेली शिस्त या अभंग गायनात असते. प्रत्येक वाराचे-दिवसाचे अभंग ठरलेले असतात. संध्याकाळची समाज-आरती, पुर्वरात्रीचे कीर्तन अन् उत्तररात्रीचा जागर यांनी प्रत्येक मुक्कामाचे तळ नामस्मरणाने सतत निनादत असतात. 'दोन्ही टिपरी एकचि नाद । सगुण निगृण नाही भेद रे' असा तत्वज्ञानाचा गोफ गुंफत वारी पंढरपुरात पोहोचते. मनाला आध्यात्मिक आनंदाचा विसावा देणारी ही भावपूर्ण भटकंती मला फार भावाली.