ते पत्र वाचून दाजीसाहेबांना अचंबा वाटला.
पाच माणसांचं काम आपण एकट्यानं केलं ही जाणीव त्यांना कधीही झाली नाही.
परमेश्वराने आपल्याला ही शक्ती कशी दिली ?
आपण सारी कामे करीत होतो, त्यामागे कसली प्रेरणा होती ?
खरं तर ज्या ब्रिटिश कंपनीत आपण काम करीत होतो, त्या कंपनीने कृपावंत होऊन ही लक्ष्मी आपणाकडे पाठवली. ती आपली नाही.
खरं तर या देशाची ती संपत्ती आहे. तिचा विनियोग देशासाठीच व्हावा. ही संपत्ती रमाकांतच्या शिक्षणासाठी खर्च करायची की टिळकांच्या पायावर व्हायची ?
अजिंक्याच्या संसाराचं रथचक्र चालवताना सारं आयुष्य खर्ची घातलं. इंग्रजांशी बंड करणारं मन इंग्रजांची सेवा करण्यात खर्ची पडलं. अचानकपणे आपल्याला कळलेलं आपल्या जन्माचं रहस्य आणि आपल्या पायांनी घरी चालत आलेली लक्ष्मी या दोन्ही गोष्टींना काहीतरी अर्थ असावा.
अर्थ समजला तो आपल्यापुरताच ठेवावा. कुणाला सांगून तरी काय करायचं आहे ?
आपण जे कार्य मनात योजलं आहे, त्याचं एखाद्या पवित्र मंत्राप्रमाणे रक्षण करायला हवं.