चिंतन हे विचारांचे मंथन आहे. स्वतःशीच केलेला संवाद आहे. आपण आपलीच समज वाढविण्यासाठी आणि निश्चयाच्या, ध्येयाच्या मार्गावरुन भरकटलेल्या मनोवृत्तींना सत्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न आहे. चिंतन आपल्या मनःवृत्तीचे स्नान आहे. त्या स्नानाने चित्त शुद्ध, विचार शुद्ध होतात. जीवनातील शाश्वत तत्वांची जपणूक व पोषण होते. मनोवृत्ती नम्र होतात. ईश्वराला समर्पित होऊन सबुरीने व संयमाने जीवन व्यतीत होते. चिंता करण्यापेक्षा चिंतन करावे चिंतन समाजातील, प्रपंचातील काही प्रश्नांचे करावे. चिंतन ईश्वराचे, त्याच्या नामाचे, गुणांचे, त्याच्या पराक्रमाचे करावे.
पूर्वी साधारण १९८० ते १९८४ च्या दरम्यान आकाशवाणी पुणे केंद्रावर सकाळी ६.१० वाजता चिंतन हा कार्यक्रम प्रसारित होत असे. ते चिंतन ऐकले की दिवसभर उत्साह आणि शांत वाटायचे, ते रोज नित्य नवीन आणि अध्यात्मिक विचारांचे व मनाला अंतर्मुख करणारे असायचे. त्या काळी मनावर झालेल्या संस्काराने, आवडीने स्वतः सह मानवी जीवनातील दुःख व त्याची कारणे यावर चिंतन, विचार करू लागलो आणि हेच चिंतन शब्द रुपाने, सद्गुरू कृपेने परिपूर्ण जीवन ह्या पुस्तकामध्ये मांडण्याचा हा केलेला छोटासा प्रयत्न. उत्कर्ष प्रकाशनाच्या सहकार्याने आपल्या समोर प्रस्तुत करू शकलो. त्यामुळे उत्कर्ष प्रकाशनाचा मी खूप आभारी आहे..