या 'उन्हातल्या सावल्या'ने समाजात बदल घडविण्यासाठी व समाजाला लागलेली वाळवी नष्ट करण्यासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे असे वाटते. लग्न ही एक तडजोड, चांगल्या नि वाईट गोष्टींची हे ज्यांना पटते ते संसारात सुखी होतात. आजच्या आधुनिक वातावरणात अवास्तव आधुनिक पाश्चात्य गोष्टींचे आकर्षण नि आर्थिक कमतरता असल्याने वैचारिक मतभेदांना वाचा फुटते, त्यातूनच दोघांनाही ती कमतरता आपल्या विरोधी दुसऱ्या माणसांत दिसली की मग त्या विरोधी माणसाचे त्यांना आकर्षण वाटू लागते. आणि मग ती दोघे एकत्र येऊ लागतात. अशाच एका समाजाने वाळीत टाकलेल्या, तिरस्काराने ज्यांच्याकडे बघितले जाते. अशा स्त्रीबरोबर एखाद्याने माणुसकी दाखवताना निर्माण झालेले प्रेम-संबंध याचे चित्रण या कथानकात केले आहे. त्यातून समाजात उमटणारे अतिशय उग्र विचार व प्रश्न यांना सामोर जाताना त्यांची होणारी फरफट आणि त्यातून मार्ग काढताना होणारे परिणाम यांची योग्य सांगड या कथानकात मांडलेली आहे. याचा शेवट गोड असो वा वाईट. ज्याच्या-त्याच्या दृष्टीकोनातून तो वेगवेगळा असला तरी योग्यच असेल. असे हे पुस्तकाचा शेवट वाचताना जाणवते, खरंच असं होईल का? कोणी तिला साथ देईल का? तिच्या भावनांची कदर, कोणी करेल का? आणि असे झाल्यास समाजाने या आधुनिक, यंत्रमानव जगात खरीखुरी आधुनिकता आणून, माणुसकीने वागून, समाजाला उच्चस्थानी पोहचवले. असं म्हणण्यास कमीपणा वाटणार नाही. आणि या वाळीत टाकलेल्या समाजाला मायेची सावली मिळाल्यावाचून राहणार नाही.