Your cart is empty now.
सर्जनशील, कवी मनाचा, संवेदनशील साहिर भौतिक गोष्टींमध्ये रस नसणारा. त्याला दिखाऊ गोष्टींचा तिटकारा. भारताच्या इतिहासाचे आणि राजकारणाचे उत्तम ज्ञान, निसर्गावर अफाट प्रेम, इतरांना समजून घेण्याचा मोठेपणा बाळगणारा. लग्नापूर्वी त्याची बऱ्याच मैत्रिणींशी निर्हेतुक जवळीक होती आणि त्यात काहीच आडपडदा नव्हता. निष्कपट, निरागस, प्रणयशील जोडीदार होता. असा नाती जोपासणारा साहिर शाश्वत मूल्यांवर घाव होत असल्याचे पाहताना हादरून जाईल का ?
सुंदर, धाडसी आणि जिद्दी सालिना त्याच्या विद्वत्तेची प्रशंसक होती. जरी ती त्याला परिपूर्ण व्यक्ती मानत असली, तरी तिच्या अपेक्षेप्रमाणे तो परिपूर्ण नवरा बनू शकेल का? त्याच्यावर जिवापाड प्रेम आणि विश्वास असूनही त्याच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे तिचा न्यूनगंड आणि त्यातून उद्भवलेली असुरक्षितता, दोघात दरी निर्माण करण्यास कारणीभूत ठरेल का? प्रेमात त्यागाची आणि समर्पणाची उत्कट भावना सर्वांत सारखीच असते का? काळाच्या ओघात प्रेम कमी होत जाते की ते खरोखरच स्थायी, शाश्वत असते ?
आयुष्य म्हणजे काय? एक निरांजन. अनेक थरांचे, प्रत्येक थरात असलेल्या अनेक वातींचे. त्या निरांजनात पेटलेल्या मैत्रीच्या वाती, नात्यांच्या वाती, आठवणींच्या वाती, अनुभवलेल्या आशा निराशेच्या प्रसंगांच्या वाती. या वाती जोपर्यंत जीव धरून धगधगत्या आहेत, तोवर निरांजनाची उपयुक्तता. या फुरफुरणाऱ्या वाती हेच तर आपल्या अस्तित्वाचे दर्शक आणि तेच तर आपल्या जगण्याचे प्रयोजन. या वाती विझल्या की ह्या जगातले आपले अस्तित्व कायमचे संपेल. म्हणूनच निरांजन हे तेवत राहो !