सर दोराबजी टाटा ट्रस्ट ही भारतातील एक मान्यवर विश्वस्त संस्था. ट्रस्टने यंदा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. माण तालुक्यातील (सातारा जिल्हा) नऊ गावात १९५५ ते १९९० ह्या काळात शेती, शिक्षण, आरोग्य क्षेत्रात विविध स्वरूपाची विकास कामे ट्रस्टने केली. या विकास प्रकल्पाचे समन्वयक म्हणून श्री. सुरेश सुरतवाला ह्यांनी कार्यक्रम नियोजन, आखणी, अंमलबजावणी ही सारी जबाबदारी समर्थपणे पार पाडली. श्री. सुरतवाला ह्यांनी 'टाटा समाजविज्ञान संस्थे'ची पदविका घेतल्यानंतर लगेच ह्या प्रकल्पाची जबाबदारी स्वीकारून ३५ वर्षे प्रकल्प कार्य सांभाळले. श्री. ज.शं. आपटे हेही टाटा समाजविज्ञान संस्थेचे माजी विद्यार्थी. त्यांनी नऊ गावांची प्राथमिक, सामाजिक, आर्थिक पाहणी केली. श्री. आपटे ह्यांनी १९६० ते १९९० अशी ३० वर्षे कुटुंब नियोजनच्या क्षेत्रात काम केले. विविध मराठी व इंग्रजी नियतकालिकांमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. ‘भारतसेवक वामनराव पटवर्धन', 'सलाम व्हिएतनाम', ‘लोकसंख्या प्रश्न : तुमचा आमचा सर्वांचा' (लेखसंग्रह) ही त्यांची तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. प्रस्तुत पुस्तकास ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ, टाटा समाजविज्ञान संस्थेचे माजी संचालक डॉ. मा. स. गोरे ह्यांची प्रस्तावना लाभली आहे.