कृषितंत्रज्ञान, कृषिप्रयोगशीलता, भरपूर उत्पन्न घेणारे लोक, शेतीविषयी मूलभूत तात्विक चितनशील व्यक्ती यांचे विचार वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न या ज्ञानप्रवाहाला शाश्वत स्वरूप प्राप्त व्हावे यासाठी या पुस्तकाचे प्रयोजन आहे. शेती क्षेत्रात अंधकार आहे. कुठे चांदण्या, काजवे तर कुठे प्रकाशाची किरणे धूमकेतूसारखी चमकतात. तर काही दीर्घकाळ चंद्रसूर्यासारखी प्रकाश देत राहतात. त्या दृष्टिकोनातून पुस्तकातील सर्व मुलाखती महाराष्ट्राच्या शेतीचा पुनर्विचार करायला लावणारे, मोठे परिवर्तन घडावं म्हणून जाणीवपूर्वक परिश्रमाने केलेले महत्वाचे काम आहे. एकदा मनाची तयारी झाल्यावरच काही चांगलं नवीन आपण करू शकतो. या उद्देशाने मनाची मशागत करण्यासाठी हे लिखाण केले आहे. या पुस्तकातील वेगवेगळ्या क्षेत्रातील विचारवंतांचे आयुष्यभराचे तत्त्वचितन, व्यक्तिरेखा समजावून घेणे, हा एक वेगळा अनुभव ठरतो. झिंग घेऊन या माणसांनी शेतीमालीची सेवा केली. नव नवे प्रयोग केले. अथक परिश्रमाने कधीच थकवा आला नाही, की अपयशानं निराशा आली नाही. या प्रतिभावंत, नवी सृष्टी निर्माण करणाऱ्या बलदंड विचारवंताचे राजकारणी, समाजसुधारक, शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, शेतकी, लोहारासारखे वारा बलुतेदार यांचे चित्रण या पुस्तकात अनुभवसाकट दिले आहे. ज्यांनी शेतीला मोठी प्रतिष्ठा दिली, नवे आव्हान स्वीकारून, नवे तंत्रज्ञान सर्वत्र वापरून पाषाणातून पाझर निर्माण केला. शेतकरी, शेतमजुरांना भक्कम आधार देऊन उभे केले. कमी खर्चात, काटकसरीने उत्पादन घेऊन, बाजारपेठेसाठी निर्यात व्यापाराची व देशातील बाजाराची कास धरली. यामुळे सुशिक्षित शेतकऱ्यांमधील मरगळ दूर होऊन नवी शक्ती सर्वसाधारण शेतकऱ्यांपर्यंत नक्की येण्यासाठी विचारधन पेरले आहे. शेती महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने, समर्थपणे कशी कशी उभी करू शकते, याच्या पायवाटा स्पष्ट केल्या आहेत. या पुस्तकात ज्यांनी शेतीचे हृदगत मांडले ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोक आहेत. उद्याची शेती जिवंत कशी होईल, शेती व शेतकऱ्यांची बलस्थाने कोणती आहेत, भविष्यकाळाचा वेध कसा घ्यायचा, जागतिकीकरणाचे महाराष्ट्राच्या शेतीवर परिणाम, अशा कितीतरी प्रश्नांची उकल या पुस्तकातून होते. डॉ. मुकुंद गायकवाड प्रसिद्ध कृषिपत्रकार आहेत. महाराष्ट्रातील पहिले शेतीसदर लिहिण्याचा मान त्यांच्याकडे जातो. गेल्या चाळीस वर्षातील हजारों लेखांच्या माध्यमातून, आकाशवाणी, दूरदर्शन यांच्या साह्याने पेरलेले विचार कुठेकुठे उगवत आहेत. साहित्यात खूप व्यक्तिचित्रे आहेत. पुत्रकामेष्टीवर पुस्तके आहेत. परंतु कृषिपत्रकारितेवर व महाराष्ट्रातील शेती व शेतकऱ्यांसंबंधी अभ्यासपूर्ण व्यक्तिचित्राचे हे एकमेव पुस्तक आहे.