टोलेजंग इमारतींच्या शहरांमध्ये वावरणारा, वातानुकूलीत वातावरणात राहणारा, सुखसोईंनी युक्त वाहनांमधून प्रवास करणारा, भांबावून टाकणाऱ्या अद्ययावत यंत्राच्या, संगणकाच्या, दूरध्वनी, दूरवाणी, दूरसंदेश, व दूरचित्रांच्या दुनियेत भ्रामकपणे वावरणारा प्रगतिशील माणूस आजही निसर्गाचा एक अविभाज्य घटक आहेच. निसर्गातील वृक्षसंपदा, वनस्पती, वाहते झरे, निर्मळ वारा व स्वच्छ वातावरण अशा सगळ्या जीवनावश्यक आविष्कारांची माणूस रोज विटंबनाच करतो आहे. पण आपल्याला पृथ्वीतलावर जगायचे असेल तर धरणीमातेच्या भव्य निर्मितीबद्दल आपल्या मनात अतीव आदर पाझरायला हवा. 'भूतां परस्परे पडो मैत्र जीवाचे' या ज्ञानेश्वर माऊलींच्या मंतरलेल्या शब्दांमध्येच आपल्या भविष्याचे बीज आहे.