लेखकाचा परिचय करून देताना अवलोकन, मनन, अभ्यास, उर्मि आणि अलिप्तता (संयम) या पंच चयनांचा विचार महत्त्वाचा असतो. या माऊली विचार ग्रंथात सद्गुरूच्या सानिध्यात राहून 'स्थितधिः किम् प्रभाषेत किमासीत वृजेतकिम् ।।' हे सर्व अवलोकन करण्याचे व सेवेचे भाग्य लाभले आहे. मननशील, चिंतनशील वृत्तीने, संत सद्गुरू संगतीचे चिंतन व ध्यान केले, त्याचाच परिपाक या ग्रंथात दिसतो. श्री. विश्वनाथराव यांचा व्यासंग खूप मोठा आहे. त्यांनी वेदांतशास्त्रातील बहुतेक ग्रंथ वाचून अभ्यासिले आहेत. पंचीकरण, विचार चंद्रोदय, विचार सागर, पंचदशी, योगवसिष्ठ, श्रीमद् भगवत् गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, शांकरभाष्य, ब्रह्मसूत्रभाष्य, इ. प्रस्थानत्रयी इत्यादी ग्रंथांचे वाचन केले एवढेच नव्हे, आर्यसमाजाच्या प्रकाशनातील सत्यार्थप्रकाश, संस्कारविधी, वेदांतदर्शन, उपनिषद्भाष्यादि महत्त्वाचे ग्रंथ वाचले आहेत. त्यांचा साहित्यसंसार फारसा नाही. परंतु पंढरी संदेश साप्ताहिकातून विचारप्रवर्तक अनेक लेख लिहिले आहेत. ते एक कुशल प्रवचनकार आणि चित्रकार होते. कोणत्याही व्यक्तीचे छायाचित्र ते अचूकपणे रेखाटत. दुर्दैवाने पू. वि. न. वेदपाठक आपल्यात नाहीत. पण हा नवा ग्रंथ ज्ञानदेवी तत्त्वबोध त्यांच्या आत्म्याला शान्ती देईल. - वा. ल. मंजूळ