व.दि. कुलकर्णी ज्ञानेश्वरांचे काव्य, तत्त्वज्ञान वाङ्मयीन दृष्टीने प्रारंभी अभ्यासणाऱ्या व आईवडिलांकडून विठ्ठलभक्तीचा वारसा लाभलेल्या व. दि. कुलकर्णी यांना बाबामहाराज आर्वीकरांच्या 'दिव्यामृतधारे ने नवी दृष्टी दिली. रामकृष्णमहाराज क्षीरसागर यांच्या कृपाशीर्वादाने 'ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरी' हे त्यांचे सततच्या चिंतनाचे व अनुभवाचे विषय ठरले. ते त्यात सर्वार्थाने मुरले व व्याख्यान-लेखनातून प्रकट होऊ लागले. संत सारस्वताची संकल्पना मांडल्यावर त्यांनी 'ज्ञानेश्वरांच्या काव्य आणि काव्य विचाराबरोबरच त्यांच्या संत, तत्त्वज्ञ व कवी' या रूपाचेही दर्शन घडवले. 'ज्ञानेश्वरांचे काव्यशास्त्र' उलगडले. 'पसायदान', 'हरिपाठ' इ.चे चिंतन श्रोत्यांसमोर ठेवले. ज्ञानेश्वरी'वर अध्यायशः विस्ताराने ते बोलले. 'अमृतानुभवाच्या रसदर्शना'च्या निमित्ताने त्या रससिद्ध सिद्धानुवादावरील त्यांचे 'अमृतानुभवाच्या वाटेनेः.' हे निरूपण येथे ग्रंथरूपात येत आहे. यात त्यांना 'शांतरसा'ची अनुभूती येते; 'आत्मज्ञान' हा त्या रसाचा स्थायीभाव जाणवतो. 'अमृतानुभवाच्या वाटेने... जाताना व. दि. केवळ त्यातील तत्त्वज्ञानाविषयी बोलत नाहीत तर काव्याच्या अंगाने येणाऱ्या तत्त्वज्ञानाच्या अनुभूतीविषयी बोलतात. प्रारंभीच्या पाच अतिशय रम्य अशा संस्कृत श्लोकांतून येणाऱ्या समग्र अमृतानुभवाचे विवरण नंतरच्या आठशे ओव्यांतून ज्ञानदेव कसे करतात, ते श्रोत्यांपर्यंत पोहोचवितात. 'अ'कारातून 'ॐ काराकडे वाटचाल करणाऱ्या व.दि.चा संतांच्या साक्षीने उच्चारला गेलेला प्रत्येक शब्द आपल्याला येथे नवनव्या रूपात उमलताना जाणवतो.