जीवनाच्या विविध क्षेत्रांत लीलया मुशाफिरी करणारी आणि जीवन
सर्वांगाने समजून घेणारी फार थोडी माणसे आसपास बघायला मिळतात. माझे ज्येष्ठ सन्मित्र बाळकृष्ण आप्पा यादव हे त्यापैकी एक. त्यांचे आत्मकथन वाचनीय झाले आहे, ते त्यांच्या वाट्याला आलेल्या अनुभवांच्या समृद्धतेमुळे. रात इतरांच्या आयुष्याचे मूल्यमापन करणे तुलनेने सोपे असते. स्वतःचे आयुष्य मूल्यमापनासाठी ताडगीत ठेवायला धारिष्ट्य लागते. ते यादव यांच्याकडे आहे. म्हणूनच आत्मप्रौढी आणि आत्मसमर्थन हे दोष त्यांच्या आत्मचरित्रात आढळत नाहीत.
लहानपणापासून खेळाची, भाषणाची आणि कुस्तीची आवड असणारे यादव विद्यार्थीदशेत चळवळीत सहभागे झाले. या चळवळींनी त्यांचा स्वत:कडे आणि समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. नामवंत बँकेत उच्चपदावर काम करणाऱ्या यादवांनी सामान्य माणसांशी असलेले नाते तुटू दिले नाही. त्यामुळे आर्थिक श्रीमंतीपेक्षाही माणसांची श्रीमंती त्यांच्या वाट्याला आली. त्यांनी साहित्य, कला, पर्यटन, राजकारण, सामाजिक आणि संस्थात्मक कार्य यांच्याशी जवळीक साधत सर्वांगाने जीवन समजून घेतले. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात उमटले आहे.
शून्यातून आपल्या आयुष्याचे जीवन शिल्प रेखाटणाऱ्या या हरहुन्नरी माणसाचे आत्मचरित्र वाचनीय झाले आहे. वाचकांना ते आवडेल असे वाटते. लेखक बाळकृष्ण यादव यांना पुढील लेखन वाटचालीसाठी खूप शुभेच्छा !