कै. राम गणेश गडकरी यांचे 'एकच प्याला' हे नाटक मराठी शोकनाट्याच्या प्रवासातील एक मानदंड म्हणून ओळखले जाते. याचाच एक परिणाम असा झालेला आहे, की अनेक नव्याजुन्या नाट्यसमीक्षकांनी आणि शोकनाट्याच्या अभ्यासकांनी 'एकच प्याला'वर विश्लेषक, वेधक व विविधांगी समीक्षा लिहिलेली आहे. केवळ एकाच शोकनाट्यावर त्याच्या निर्मितीपासून प्रत्येक दशकामध्ये नित्यनूतन समीक्षा होत राहण्याचा बहुमान गडकरीकृत 'एकच प्याला'ला जसा मिळाला तसा अन्य कोणत्याही शोकनाट्याला मिळालेला दिसत नाही. म्हणूनच 'एकच प्याला' या शोकनाट्याच्या समीक्षेचीच समीक्षा होण्याची नितांत आवश्यकता होती. डॉ. विनायक गंधे यांनी हे कार्य करून नाट्यविचाराच्या क्षेत्रात एक आगळीवेगळी भरच घातलेली आहे. मराठीतील ज्येष्ठ समीक्षक प्रा. गो. म. कुलकर्णी डॉ. गंधे यांना पाठविलेल्या खाजगी पत्रात लिहितात, “एका नाट्यकृतीवर एवढा सर्वांगीण परामर्श घेतलेला बहुधा हा मराठीतील पहिलाच प्रबंध असावा... तुम्ही प्रबंधलेखनाबाबत अमाप कष्ट घेतल्याचे व विचक्षणपणे विवेचन केल्याचे पानापानातून जाणवते. ' " प्रचलित आणि मुख्य म्हणजे केवळ वृत्तपत्रीय 'साजिऱ्या' नाट्यसमीक्षेच्या पलीकडील नाट्यसमीक्षाक्षितिजे धुंडाळणारा . डॉ. विनायक गंधे यांचा प्रस्तुत ग्रंथ अभ्यासकांना व नाट्यरसिकांना नवी मूल्यवेधक नाट्यसमीक्षादृष्टी देणारा ठरेल.