सावली
मुंगीची सावली डोंगराची सावली झाडांची सावली फुलांची सावली मनुष्याची सावली
सावली,
जन्मापासून मरेपर्यंत, सतत जवळ असणारी, चितेवर देह ठेवला गेल्यावर, किंवा सहा फूट जमिनीच्या कुशीत शरीर पुरलं जाईपर्यंत, बरोबर असणारी ही सावली शेवटी मिळते, गाडली जाते......
सावली,
आजारी असताना, आईच्या मांडीवर डोके ठेवून रडताना, बाबांचे बोट धरून पुस्तके घेताना, पहिल्या पगाराचे रुपये बायकोच्या हातावर ठेवताना, मुलीला कडेवर घेऊन खेळत असताना, आपल्या बरोबर तीही हसते, रडते, खेळते......
सावली,
सूर्य डोक्यावर आला म्हणजे सावली लहान होते; कधी कधी दिसतही नाही. सूर्य 'पश्चिमेकडे लवंडला, की ती क्षीण होत जाते; अशक्त होत जाते, जीवनाची दुपार संपली की असंच होतं. जीवनातही हळूहळू अंधाराचे राज्य पसरायला लागते......
सावली,
मग ती पर्वताची असो किंवा मुंगीची, आपल्या अंधारी पोटात सगळं सामावून ठेवते; कारण तीच आपली साथीदारीण, मैत्रीण असते. तिला बोलता आलं तर कितीतरी गुपितं बाहेर पडली असती; पण ती बरोबर राहते एका मूक प्राण्यासारखी. देवाने जे वाढून ठेवलंय त्यापेक्षा एक दाणाही आपल्याला अधिक मिळणार नाही हे माहीत असूनही, आपण आशा करत असतो. आशा-निराशेचा हा खेळ चालूच राहतो, कुणाच्या पायाखाली चिरडले जाईपर्यंत...
याकूब सईद