...हे देवाधिदेवा, ... माझ्या मूक-बधिर मुलांच्या अंतःकरणात एक भयाण शांततेचा तुरुंग आहे. करुणेचा एक शब्द किंवा संगीताची एक ललकार सुद्धा तिथे पोहोचत नाही. त्यांना विचार स्फुरतात; पण मुकेपणाच्या वेड्या पायात पडल्याने जागच्या जागीच ते धडपडतात. त्यांच्या विचारांना शब्दांचे पंख तुझ्यावाचून कोण देणार? ... हे देवा, माझ्या आंधळ्या मुलांच्या जीवनात घनदाट काळोखाचे साम्राज्य आहे. मी आभाळाची निळाई, इंद्रधनुष्याचे ते स्वप्नील रंग आणि ह्यापेक्षाही देवा, तुझे सगुण साकार रूप ह्याला ती मुले पारखी झाली आहेत. त्यांना विजेचा लखलखाट नको; पण निरांजनाचा शांत प्रकाश तरी दे. म्हणजे त्यांचा जीवनमार्ग उजळून जाईल. ... हे देवाधिदेवा, माझ्या पंगू मुलांची मने वाऱ्यापेक्षाही चपळ आहेत. पण ह्या पंगूपणाने त्यांची जखडबंदी झाली आहे. इवलीशी चिमणी भुर्रकन उडून जाते. तर मग हे परावलंबी जिणे या मुलांच्या वाट्याला का यावे! त्यांना पंख देऊ नकोस. पण आपल्या पायांवर उभे राहण्याची त्यांना शक्ती दे. ... हे देवाधिदेवा, कितीही प्रयत्न केला तरी माझ्या मतिमंद मुलांची बुद्धी चालत नाही. त्यांना विचार स्फुरत नाहीत. त्यांच्या भाव-भावनांचा कोंडमारा होतो. या मनोदुर्बल आणि मतिमंद मुलांना बुद्धीचे वरदान दे. त्यांना शिक्षणाचे महाद्वार उघडून दे. ... देवा, माझ्या महारोगी मुलांचे अश्रू पुसायला कोणीही नाही. घर असून ती पोरकी आहेत. त्यांची बोटे बधिर आहेत; पण समाजाचे अंतःकरण त्याहूनही बधिर आहे. देवा, तुझ्या सुवर्णस्पर्शाने त्यांचा कलंक जाऊ दे. या बधिर समाजाला प्रेमाचा पाझर फुटू दे.. ... हे देवाधिदेवा, माझ्या अनाथ आणि उन्मार्गी मुलांना मार्ग दाखव. त्यांना स्वतःसाठी धडपड करण्याचे सामर्थ्य दे. त्यांच्यातील पुरुषार्थ आणि पराक्रम प्रज्वलित होऊ दे. कारण या नावडत्या मुलांना परावलंबी करुणा, दयेची भीक नको आहे, त्यांना आत्मसामर्थ्याचा साक्षात्कार हवा आहे.