मला जे जे माझे आवडते छंद आहेत त्यामध्ये भाषणांच्या माध्यमातून श्रोत्यांशी आणि लेखनांच्या माध्यमातून वाचकांशी संवाद साधण्याची अतिशय आवड आहे. त्यामुळे मला आजपर्यंत अनेक माणसे जोडता आली. या सर्वांमुळे तरुण माणसं, महाविद्यालयातले विद्यार्थी, शाळेतील लहान मुलं यांच्याशी माझी मैत्री जमली. या सगळ्या लोकांशी संवाद करताना मला अनेक अनुभव आले. त्यातील काही कायमचे लक्षात राहिले. आणि मग माझ्या हातून समाजमनाला स्पर्श करणाऱ्या अनेक घटना, अनेक प्रसंग त्या त्या वेळी मी लिहिले. या पुस्तकात या सगळ्या विविध विषयांवर केलेले लेखन वाचकांपुढे ठेवावंसं वाटलं. आणि हे उत्कर्ष प्रकाशनाच्या सहकार्यामुळे शक्य झालं.
सभोवताली घडणाऱ्या अनेक घटना मनामध्ये आणि अंतःकरणामध्ये स्पंदनं निर्माण करतात. मनात येणारे हे विचार वाचकांना सांगण्याची उत्कट इच्छा होती. आपल्या प्रत्येकाचं आयुष्य ही एक अडथळ्याची शर्यत असते. त्यामुळे दैनंदिन जीवनात ताणतणाव निर्माण होतात. अडचणींना हसतहसत तोंड द्यावं लागतं. यासाठी सकारात्मक विचार करावा लागतो. आणि मनात निर्माण होणाऱ्या खऱ्या किंवा काल्पनिक भीतीवर आपणास धैर्याने आव्हान द्यावं लागतं.