असामान्य बुद्धिमत्ता, निष्कलंक, धवल चारित्र्य आणि सामाजिक न्यायासाठी व समतेसाठी आयुष्यभर केलेले अथक परिश्रम, हे मधू लिमयांच्या जीवनाचे तीन पैलू होते. मधू लिमये यांनी विरोधी पक्षातील खंबीर आणि प्रभावी संसदपटू म्हणून अत्यंत मौलिक कामगिरी केली हे सर्वमान्य झालेले आहे. जागतिक कीर्तीचे संसदपटू म्हणून ते लौकिक पावले. त्यांचा सांसदीय कार्यपद्धतीचा सूक्ष्म अभ्यास, विविध विषयांचा गाढ व्यासंग आणि तर्कशुद्ध बिनतोड युक्तिवाद करण्याचे सामर्थ्य यामुळे अधिकारारूढ काँग्रेस पक्षाला त्यांची सतत दहशत वाटे. विचारांची संपन्नता, तेजस्वी वाणी, लेखणीचे सामर्थ्य, न्यूनगंडाचा पूर्ण अभाव, आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रभुत्व, सत्ता व संपत्ती यांचा रतिमात्रही लोभ नाही. त्यांच्या सच्चेपणात एक वेगळी शालीनता होती. जे करायचे ते अगदी आत-आतल्या कप्प्यापासून करायचे. अगदी पारदर्शित्व, कथनी व करणीत
विलक्षण साम्य, ते लोहियांचे साथी होते. पण त्याबरोबरच जे.पीं.चे विश्वासपात्र होते.
"An angry parliamentarian who always keeps the government on its toes" - Smt. Vijayalakshmi Pandit