त्या रविवारच्या वादळी तिन्हीसांजेला समोरचं दृष्य बघून पार मुळापासून उन्मळून गेलेली उवी त्या खोलीत क्षणभरही न थांबता धावत खोलीत जाऊन बेडवर कोसळली होती. काहीतरी जिवाभावाचं, आधार देणारच नाहीसं झालं होतं. नंतर रात्री बऱ्याच उशीरापर्यंत जवळ जवळ दर अर्धा तासाने येणाऱ्या पपांच्या हाकांना, दाराबाहेरून त्यांनी केलेल्या विनवण्यांना रिस्पॉन्स देणं शक्यच होत नव्हतं तिला. शेवटी खूप उशीरा कधीतरी तिला झोप लागली, पण परत पहाटे लवकर तिला काहीतरी भयंकर विचित्र स्वप्नांनी जाग आली आणि मग डोळे मिटायचीच तिला भीती वाटू लागली. स्वप्नात सुरुवातीला तिला पोर्ट्रेटमधली ममा जिवंत रुपात दिसली. ममा दिवाणावर चित्रासाठी पोझ देऊन बसली होती आणि मेघना आंटी कॅन्व्हासवर तिचं चित्र काढीत होती. विअर्ड गोष्ट म्हणजे ममाच्या पोटातील बाळाला, स्वतःलाही, ती स्वप्नात बघत होती. ते बाळ समोर कॅन्व्हासवर चित्रित होणाऱ्या आपल्या आईकडे टक लावून बघत होते. अचानक कुठून कोण जाणे तो भयंकर पशू तेथे आला आणि त्याने ममाच्या अंगावर झेप घेतली. या पशूचा चेहरा बदलत जात होता सारखा. मधूनच तो साहिलसारखा दिसत होता तर मधूनच वेगळाच भासत होता. झोपेत, स्वप्नातच काही वेळाने उर्वीला तो चेहरा कोणाचा आहे हे लक्षात आले. मधे टीव्हीवर सतत एका सात वर्षाच्या मुलीवर रेप झाल्याची बातमी दाखवायचे. तो चेहरा त्या माणसाचा होता आणि मग काही क्षणात तिला पोर्ट्रेट काढणाऱ्या मेघनाआंटीला गच्च धरून उभी असलेली आत्ताची ती, म्हणजे मोठी झालेली उर्वी दिसू लागली. ती जोरजोरात देवेनला हाका मारत होती. देवेन आला खरंच तिथे, पण ममाला त्या पशूच्या तावडीतून सोडविण्याकरिता तो पुढे जाणार इतक्यात त्या पशूच्या बदललेल्या चेहऱ्याकडे नजर गेल्यावर तो जागेवरच खिळून उभा राहिला.