दैनंदिन जीवनात येणारा जाती व्यवस्थेचा अनुभव आणि त्यातून निर्माण झालेल्या विषम परिस्थितीवर मात करणाऱ्या वंदनाचा संघर्ष वाचकांना खिळवून ठेवणारा आहे. एक स्त्री, त्यातही दलित स्त्री, कुटुंब प्रमुख स्त्री, तिचा संघर्ष वाचनीय आहे. शहाजीराव बलवंत यांनी शिक्षणाचा अभाव आणि पारंपरिक आर्थिक व सामाजिक दारिद्र्य असणाऱ्या मागास वस्तीतील लोकांच्या जीवनाचे चित्रण अगदी हबेहब केले आहे. बौद्ध कुटुंबात जन्मलेली वंदना, तिच्या वसतीगृहातील मैत्रिणींमधील आपसातील संवादातून कादंबरीची सुरूवात होते. पुढे अस्सल माणदेशी भाषा वाचकांना वाचावयास मिळते. पात्रांची ग्रामीण जगण्याची नाळ जोडते. दारिद्र्य अनुभवलेली वंदना, ग्रामीण भागात जन्मलेली वंदना ते आय. ए. एस. अशी उच्च शिक्षित झालेली वंदना, अशी पार्श्वभूमी असलेली ही कादंबरी असली तरी या कादंबरीला अनेक पदर आहेत. प्रत्येक पदर उलगडताना वाचक हरवून जातो. दारिद्र्य, असमानता आणि जातीव्यवस्थेचा कटू अनुभव, देखणी असल्याने समाजाची नजर अगदी आय. ए. एस. झाल्यानंतरही तेच अनुभव तिच्या वाट्यास येतात. तिचा शांत सोशिक स्वभाव भुरळ घालून जातो. खेड्यातले वातावरण व तिथले अजूनही जातीपातीचे विष, त्याची रुजलेली पाळेमुळे अधोरेखीत करण्याचा प्रयत्न शहाजीराव बलवंत यांच्या सिद्धहस्त लेखणीने केला आहे.